शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण काळाची गरज : पंतप्रधान मोदी   

नवी दिल्ली : युवकांच्या आणि देशाच्या भविष्यासाठी शिक्षण व्यवस्था महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे एकविसाव्या शतकाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यासाठी सरकार कार्यरत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले.
 
भारत मंडपम येथे युग्म इनोव्हेशन कॉन्क्लेव्हचे काल आयोजन केले होते. त्या प्रसंगी मोदी बोलत होते. कल्पकतापूर्ण उत्पादने कमी वेळेत तयार करता येणे शक्य आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम, आधुनिक विश्लेषण, अवकाश तंत्रज्ञान, आरोग्य तंत्र आणि कृत्रिम जीवशास्त्र यांचा प्रभावी वापर करणे काळाची गरज आहे. भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत असून ते स्वीकारत चालला आहे. आधुनिक भारत घडविण्यासाठी शिक्षण यंत्रणेचे आधुनिकीकरण करणे काळाची गरज आहे. त्या माध्यमातून २१ व्या शतकातील गरजांचा आपुर्ती सहज होईल. नवे शैक्षणिक धोरणाची रचना देखील जागतिक शिक्षणाच्या मानकांनुसार आहे. या धोरणामुळे देशाच्या शैक्षणिक यंत्रणेत बदल होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुढील २५ वर्षात भारताला विकसित देश बनविण्याचे ध्येय गाठण्यासाठी नवीन कल्पना आणि तशा उत्पादनांची गरज भासणार आहे. ती कमी वेळेत तयार व्हावीत, यासाठीं त्याचे मॉडेल तयार करणे गरजेचे आहे. संशोधन प्रयोगशाळेपर्यत मर्यादित राहता कामा नये. त्याचा वापर सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संशोधनाचा विस्तार झाला पाहिजे. नव्या कल्पनांचे योगदान त्यात दिसले पाहिजे. संशोधनाला अधिक चालना देण्यासाठी संशोधनात्मक वातावरण तयार झाले पाहिजे. त्यासाठी शैक्षणिक संस्था, गुंतवणूकदार आणि उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles